नमस्कार,

वेचक ह्या संकेतस्थळावर आपलं स्वागत आहे. ह्या संकेतस्थळावर विविध प्रकारची सामग्री देण्याचा विचार आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यांचा ह्या सामग्रीला संदर्भ असेल. पण ही त्या सामग्रीची मर्यादा असणार नाही. केवळ मनोरंजन हा ह्या संकेतस्थळाचा हेतू नाही. जमेल तितका मेंदूला खाद्य पुरवण्याचा प्रयत्न राहील. संदर्भमूल्य असलेल्या सामग्रीला प्राधान्य असेल.

नियतकालिकांची एका शतकापेक्षा मोठ्या कालावधीची परंपरा मराठीला लाभली आहे. पण दुर्दैवाने तिच्या जतन-संवर्धनाची परंपरा फारच क्षीण आहे. ह्या नियतकालिकांत विखुरलेलं, पुस्तकरूपात ग्रथित न झालेलं असं लेखन बरंच आहे. त्यांपैकी काही वेचून इथे देण्याचा मानस आहे. असं करताना आवश्यक तिथे लेखकांची अनुमती घेऊन मगच ते साहित्य इथे घालण्यात येईल.

ह्याव्यतिरिक्त महत्त्वाचं वाटणारं, प्रसार व्हावा असं वाटणारं ग्रंथरूपातलं किंवा ग्रंथरूप न घेतलेलं, नवं-जुनं साहित्यही इथे देण्याचा मानस आहे. मराठी भाषेविषयीची विविध प्रकारची उपयुक्त सामग्री यथावकाश ह्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.

महाजालावरील मराठी संदर्भसाधने

महाजालावर उपलब्ध असलेल्या मराठी भाषेतील तसेच मराठीभाषाविषयक संदर्भसाधनांंच्या माहितीचे संकलन ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. इथे नोंदवलेली संदर्भसाधने विविध व्यक्ती अथवा संस्था ह्यांनी महाजालावर आधीच आणि स्वतंत्रपणे उपलब्ध केलेली आहेत. इथे केवळ त्यांचे दुवे एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. संदर्भसामग्रीचे संपूर्ण श्रेय आणि दायित्व त्या त्या व्यक्ती अथवा संस्था ह्यांचेच आहे.

ग म भ न

सप्टेंबर १९८२ ते ऑक्टोबर १९८६ ह्या कालावधीत ललित मासिकात पंतोजी ह्या टोपणनावाने प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी मराठीचे शुद्ध लेखन  ह्या विषयावर एक लेखमाला चालवली होती. मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीच्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह ह्या लेखमालेत झाला आहे. ह्या लेखमालेतील एकूण ३१ लेख इथे लेखक आणि प्रकाशक ह्यांच्या अनुमतीने प्रकाशित करत आहोत.

Subscribe to वेचक RSS